अहिल्याबाई होळकर - यांचे सामाजिक कार्य | Social welfare work of Ahilyabai holkar

 

अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य

 अहिल्याबाईं यांचे लोक कल्याणकारी कार्य :

 अहिल्याबाईंची ओळख एक विनम्र आणि उदार शासक म्हणून सर्वदूर होती. गरजवंतांसाठी, गरीबांकरता, असहाय्य व्यक्तींसाठी त्यांच्या हृदयात करुणेचा सागर उफाळून येत असे. 

समाजसेवेचे व्रत अंगिकारलेल्या अहिल्याबाईंनी समाजाकरता स्वतःला पूर्णतः वाहुन घेतले होते. त्या कायम आपल्या प्रजेचे आणि समाजाचे भले होण्याचा विचार करीत असत आणि त्या दृष्टीकोनातून कार्यरत रहात असत.

अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य (Social welfare work of Ahilyabai holkar)

दुष्काळात मदत 

कोठे दुष्काळ पडला तर त्या प्रदेशात त्या धान्य पाठवीत. कोणावर अन्याय घडला तर तो दूर करीत. 

धर्मशाळा बांधणे

प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण विश्रांतीसाठी ओटे व धर्मशाळा बांधल्या. 

भारतातील यात्रिकांसाठी त्यांनी धर्मशाळा बांधल्या.  हिमालयात बद्रिनारायण क्षेत्री त्यांनी बांधलेली धर्मशाळा आहे. 

हरिद्वारला अशीच एक धर्मशाळा आहे. रामेश्वर, अमरकंटक, मथुरा, सप्तशृंगी या तीर्थक्षेत्री पण त्यांनी धर्मशाळा बांधल्या. जेजुरीचा तलाव आणि मंदिर हे त्यांचेच कर्तृत्व आहे. 

मंदिरांचा जीर्णोद्धार 

त्यांनी काही मंदिरांचा जीर्णोद्धार केला. काशीचा विश्वेश्वर, गयेचा विष्णू, सोरटीचा सोमनाथ, परळीचा वैद्यनाथ, वेरूळचा घृष्णेश्वर यांना त्यांनी सनाथ केले. 

धर्म हा लोकांच्या भावनेचा विषय आहे, हे अहिल्याबाईंनी जाणले होते. धर्मामुळे काही जीवननिष्ठांचे जागरण होते, अशी त्यांची श्रद्धा होती. 

सर्वधर्मसमभावाचा आदर्श मिरवीत मंदिरे ,मशिदी, दर्गे व विहार बांधले. 

तलाव, विहिरी, अन्नछत्रे, पाठशाळा बांधणी

अहिल्याबाईंनी बांधलेले तलाव, खोदलेल्या विहिरी, उघडलेली अन्नछत्रे, चालविलेल्या पाठशाळा सर्वांना मुक्तद्वार होत्या. 

घाट बांधतांना केवळ तज्ञांची मत विचारात न घेता प्रत्यक्ष त्या भागातील स्त्रियांना बोलून घाटाच्या पायऱ्या कशा हव्यात , कपडे धुताना बाळ कुठे ठेवायला सोयीस्कर पडेल, कपडे बदलताना खोल्या कुठे असाव्यात? इतक्या बारीक तपशिलासह घाट बांधून घेतले.

कलावंतांचा सन्मान

जातीयता, प्रांतीयता, क्षुद्रता यांचा लवलेशही त्यांच्या ठायी नव्हता. प्रतिभावंतांचा सत्कार करणे, कलावंतांना पुरस्कार देणे हा अहिल्याबाईंच्या धोरणाचा भाग होता. 

इंदोर वरून  राजधानी महेश्वर या ठिकाणी आणून कारागीर ,मजूर, विणकर, कलावंत , साहित्यिक अशा गुणी लोकांच्या विकासासाठी जमीन, पैसा, घर इत्यादी सोयी उपलब्ध करून दिल्या.

महाराष्ट्रातून अहिल्याबाईंच्या भेटीसाठी गेलेले कविवर्य मोरोपंत आणि शाहीर अनंत फंदी यांचा अहिल्याबाईंनी आपल्या राजधानीत सत्कार केला. 

भिल्ल समाजासाठी कार्य

संगमनेरचे अनंत फंदीही इंदूरला जाताना सातपुड्यात अडखळले, वाट चुकले आणि भिल्लांच्या तावडीत सापडले; पण योग असा, की ते अहिल्याबाईंकडे निघाले आहेत हे कळल्यावर भिल्लांनी त्यांना मोठ्या इतमामाने वागवले.  सातपुड्यात भिल्लांच्या टोळ्या होत्या. वाटमारी करणे, व्यापाऱ्यांना लुटणे हा त्यांचा उद्योग होता. 

त्या वेळी डोंगर मुलखातून भिल्ल आणि गोंड आदिवासी हे प्रवाशांना उपद्रव देत अन् त्यांच्याकडून ‘भिलवडी’ नावाचा कर वसूल करत. तेव्हा अहिल्याबाईंनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा कर  घेण्याचा अधिकार मान्य केला. त्यांच्याकडून पडिक भूमीची लागवड करून घेतली, तसेच त्यांना विशिष्ट सीमा नेमून दिली आणि भूमी करार पट्ट्याने देण्याची पद्धत चालू केली.

अहिल्याबाईंनी या भिल्लांना पडीक जमिनी कसण्यासाठी दिल्या आणि त्यांच्या निर्वाहाचा प्रश्न सोडवला. 

कायद्यांत सकारात्मक बदल

अहिल्याबाई यांनी पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. करपद्धती सौम्य केली,  मात्र शेतसारा (कर)  चालू ठेवला. गावोगावी न्याय देणारे पंच अधिकारी नेमले. 

उद्योगांना चालना

अहिल्याबाई यांनी राज्यकारभारासाठी राज्याची राजधानी इंदूरहून नर्मदा नदीच्या तीरी महेश्वर येथे हालवली. 

 अहिल्याबाईंनी वस्त्रोद्योगास चालना दिली. कोष्टी लोकांची वसाहत स्थापन करून उत्तम हातमागाची कपडे (उंची वस्त्रे) बनतील, अशी पेठ स्थापन केली.

 आजही महेश्वरी साड्या, पैठणी, धोतर प्रसिद्ध आहेत.

रस्ते व महारस्ते बांधल्यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळाले. तसेच मजुरांना काम मिळाले.

पर्यावरण व जैवविविधता संरक्षण 

राज्यात पशुपक्षी यांना चरण्यासाठी त्यांनी कुरणे राखली. मुंग्यांना साखर, माश्यांना कणकेचा गोळा टाकण्याची सोय केली.

प्रवाशांसाठी मार्गावर अरण्यमय प्रदेशातही आंबराई, बगीचे ,वृक्षारोपण केले.

दानधर्म

उन्हाळ्यात वाटसरूंना पिण्यासाठी पाणपोया, हिवाळ्यात गरजूंना गरम कपडे यांची सोय केली.  दिव्यांग, अनाथ व असहाय्य लोकांचे पुनर्वसन केले. गोरगरिबांसाठी अन्नछत्रे व सदावर्ते चालविली. वस्त्रांचे वाटप केले. 
आपल्या राज्यात एखादा सूक्ष्मजीवही उपाशी राहू नयेत याची काळजी घेतली. 

अहिल्याबाईंनी प्रवचने केली नाहीत. व्याख्याने दिली नाहीत. ग्रंथ लिहिले नाहीत; पण हे जग सुखी आणि सुंदर व्हावे म्हणून जन्मभर धडपड केली.

 माधव ज्युलियन आपल्या एका कवितेत अहिल्याबाईंचे गुणगान करताना म्हणतात :

स्थळे शोधूनी निसर्गसुंदर, रम्य मंदिरे घाट कुणी ॥                                                     वा पडशाळा बांधूनी केले, येते जाते लोक ऋणी ॥

  Social welfare work of Ahilyabai holkar

अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य | Social welfare work of Ahilyabai holkar

अहिल्याबाईंचे राजपद म्हणजे उपभोगरहित सेवायोग होता. अहिल्याबाई पांढरे वस्त्र परिधान करीत. आपल्या वैराग्याचे गमक म्हणून पांढऱ्या घोंगडीवर बसून आपला कारभार पाहत. 

 राज्याची दौलत प्रजेसाठी आणि खासगीतील रक्कम स्वखर्चासाठी व दानधर्मासाठी, हा संकेत त्या कटाक्षाने पाळीत.

त्यावेळेच्या विधवा महिलांसाठी त्यांनी चांगलं कार्य केलं. आणि त्यांच्यासाठी त्या वेळी बनविण्यात आलेल्या कायद्यात देखील बदल केला. 

त्या वेळच्या कायद्याप्रमाणे जर एखादी महिला विधवा झाली आणि तिला मुलबाळ नसेल तर तिची सगळी संपत्ती सरकारी खजिन्यात किंवा राजकोशात जमा होत असे. 

परंतु अहिल्याबाईंनी या कायद्यात बदल करून महिलांना आपल्या पतीच्या संपत्तीचे वारसदार बनविले. या व्यतिरिक्त त्यांनी महिलांच्या शिक्षणावर फार भर दिला.

अहिल्याबाई होळकर यांचे सामाजिक कार्य | Social welfare work of Ahilyabai holkar


अहिल्यादेवींच्या काळातील किल्ले व भुईकोट:
  • किल्ले महेश्वर
  • इंदोरचा राजवाडा
  • चांदवडचा रंगमहाल
  • वाफगाव - यशवंतराजे होळकर यांचे जन्मस्थळ
  • खडकी-पिंपळगाव : होळकर वाडा
  • काठापूर : होळकर वाडा किंवा वाघ वाडा
  • पंढरपूर : होळकर वाडा
  • लासलगाव : अहिल्यादेवींचा किल्ला
  • पळशी : पळशीकर वाडा(होळकरांचे दिवाण)
  • रायकोट किल्ला कोंडाईबारी घाट


अहिल्यादेवींच्या काळातील मंदिरे बारव व धर्मशाळा :

  • अकोले तालुका- विविध ठिकाणी विहिरी उदा. वाशेरे, वीरगाव, औरंगपूर.
  • वीरगाव - बारव
  • अंबा गाव – दिवे.
  • अमरकंटक (मप्र)- श्री विघ्नेश्वर, कोटितीर्थ, गोमुखी, धर्मशाळा व वंश कुंड
  • अलमपूर (मप्र) – हरीहरेश्वर, बटुक, मल्हारीमार्तंड, सूर्य, रेणुका,राम, हनुमानाची मंदिरे, लक्ष्मीनारायणाचे,मारुतीचे व नरसिंहाचे मंदिर, खंडेराव मार्तंड मंदिर व मल्हाररावांचे स्मारक
  • आनंद कानन – श्री विघ्नेश्वर मंदिर.
  • अयोध्या (उ.प्र.)– श्रीरामाचे मंदिर, श्री त्रेता राम, श्री भैरव, नागेश्वर/सिद्धार्थ मंदिरे, शरयू घाट, विहिरी, स्वर्गद्वारी मोहताजखाना, अनेक धर्मशाळा.
  • आमलेश्वर, त्र्यंबकेश्वर मंदिरांचा जीर्णोद्धार
  • उज्जैन (म.प्र.)– चिंतामणी गणपती,जनार्दन,श्री लीला पुरुषोत्तम,बालाजी तिलकेश्वर,रामजानकी रस मंडळ, गोपाल, चिटणीस, बालाजी, अंकपाल, शिव व इतर अनेक मंदिरे,१३ घाट, विहिरी व अनेक धर्मशाळा इत्यादी.
  • ओझर (अहमदनगर) (महाराष्ट्र) – २ विहिरी व एक कुंड.
  • इंदूर – अनेक मंदिरे व घाट
  • ओंकारेश्वर (मप्र) – मामलेश्वर महादेव,
  • कर्मनाशिनी नदी – पूल
  • काशी (बनारस) – काशी विश्वनाथ,श्री तारकेश्वर, श्री गंगाजी, अहिल्या द्वारकेश्वर, गौतमेश्वर व अनेक महादेव मंदिरे, मंदिरांचे घाट, मनकर्णिका, दशास्वमेघ, जनाना, अहिल्या घाट, उत्तरकाशी, रामेश्वर पंचक्रोशी, कपिलधारा धर्मशाळा, शीतल घाट.
  • केदारनाथ – धर्मशाळा व कुंड
  • कोल्हापूर (महाराष्ट्र) – मंदिर-पूजेसाठी साहाय्य.
  • कुम्हेर – विहीर व राजपुत्र खंडेरावांचे स्मारक.
  • कुरुक्षेत्र (हरयाणा) - शिव शंतनु महादेव मंदिरे,पंचकुंड व लक्ष्मीकुंड घाट.
  • गंगोत्री –विश्वनाथ, केदारनाथ, अन्नपूर्णा, भैरव मंदिरे, अनेक धर्मशाळा.
  • गया (बिहार) – विष्णूपद मंदिर.
  • गोकर्ण – रावळेश्वर महादेव मंदिर, होळकर वाडा, बगीचा व गरीबखाना.
  • घृष्णेश्वर (वेरूळ) (महाराष्ट्र) – शिवालय तीर्थ.
  • चांदवड वाफेगाव (महाराष्ट्र) – विष्णूचे व रेणुकेचे मंदिर.
  • चिखलदा – अन्नछत्र
  • चित्रकूट (उ.प्र.) - श्रीरामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
  • चौंडी – चौडेश्वरीदेवी मंदिर, सिनेश्वर महादेव मंदिर, अहिल्येश्वर मंदिर, धर्मशाळा व घाट
  • जगन्नाथपुरी (ओरिसा) – श्रीरामचंद्र मंदिर, धर्मशाळा व बगीचा
  • जळगांव (महाराष्ट्र) - राम मंदिर
  • जांबगाव – रामदासस्वामी मठासाठी दान
  • जामघाट – भूमिद्वार
  • जेजुरी(महाराष्ट्र) – मल्हारगौतमेश्वर, विठ्ठल, मार्तंड मंदिरे, जनाई महादेव व मल्हार या नावाचे तलाव.
  • टेहरी (बुंदेलखंड) – धर्मशाळा.
  • तराना? – तिलभांडेश्वर शिव मंदिर, खेडपती, श्रीराम मंदिर, महाकाली मंदिर.
  • त्र्यंबकेश्वर (नाशिक) (महाराष्ट्र)– कुशावर्त घाटावर पूल.
  • द्वारका (गुजरात) – मोहताजखाना, पूजागृह व पुजाऱ्यांना काही गावे दान.
  • श्री नागनाथ (दारुकावन) – १७८४मध्ये पूजा सुरू केली.
  • नाथद्वार – अहिल्या कुंड, मंदिर, विहीर.
  • निमगाव (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • नीलकंठ महादेव – शिवालय व गोमुख.
  • नैमिषारण्य (उ.प्र.) – महादेव मंडी, निमसर धर्मशाळा, गो-घाट, चक्रीतीर्थ कुंड.
  • नैम्बार (मप्र) – मंदिर
  • पंचवटी (नाशिक)(महाराष्ट्र)– श्री राम मंदिर, गोरा महादेव मंदिर, विघ्नेश्वर मंदिर, धर्मशाळा, रामघाट.
  • पंढरपूर (महाराष्ट्र) – श्री राम मंदिर, तुळशीबाग, होळकर वाडा, सभा मंडप, धर्मशाळा व मंदिरास चांदीची भांडी दिली. बाजीराव विहीर
  • पिटकेश्वर, ता. इंदापूर - पंढरपूर वारीच्या जुन्या मार्गावर बांधलेली बारव 
  • पिंपलास (नाशिक) (महाराष्ट्र)– विहीर.
  • पुणतांबे (महाराष्ट्र) – गोदावरी नदीवर घाट.
  • पुणे (महाराष्ट्र) – घाट (कोणता घाट?)
  • पुष्कर – गणपती मंदिर,मंदिरे,धर्मशाळा व बगीचा.
  • प्रयाग (अलाहाबाद,उ.प्र.) - विष्णू मंदिर, घाट व धर्मशाळा, बगीचा, राजवाडा.
  • बद्रीनारायण (उ.प्र.) –श्री केदारेश्वर मंदिर, हरिमंदिर, अनेक धर्मशाळा (रंगदचाटी, बिदरचाटी, व्यासंग, तंगनाथ, पावली) मनु कुंड (गौरकुंड व कुंडछत्री), देवप्रयाग येथील बगीचा व गरम पाण्याचे कुंड, गायींच्या चरण्यासाठी कुरणे.
  • बऱ्हाणपूर (मप्र) – घाट व कुंड.
  • बिठ्ठूर – ब्रह्मघाट
  • बीड (महाराष्ट्र)– घाटाचा जीर्णोद्धार.
  • बेल्लूर (कर्नाटक) – गणपती, पांडुरंग, जलेश्वर, खंडोबा, तीर्थराज व अग्नि मंदिरे, कुंड
  • ' भरतपूर' – मंदिर, धर्म शाळा व कुंड.
  • भानपुरा – नऊ मंदिरे व धर्मशाळा.
  • भीमाशंकर (महाराष्ट्र) – गरीबखाना
  • भुसावळ (महाराष्ट्र) - चांगदेव मंदिर
  • मंडलेश्वर – शिवमंदिर घाट
  • मनसा – सात मंदिरे.
  • महेश्वर - शंभरावर मंदिरे, घाट, धर्मशाळा व घरे.
  • मामलेश्वर महादेव – दिवे.
  • मिरी (अहमदनगर) (महाराष्ट्र) – सन १७८० मध्ये भैरव मंदिर
  • रामपुरा – चार मंदिरे, धर्मशाळा व घरे.
  • रामेश्वर (तामिळनाडु) – हनुमान व श्री राधाकृष्ण यांची मंदिरे, धर्मशाळा, विहीर, बगीचा इत्यादी.
  • रावेर (महाराष्ट्र)– केशव कुंड
  • वाफगाव(महाराष्ट्र) – होळकर वाडा व विहीर.
  • श्री विघ्नेश्वर – दिवे
  • वृंदावन (मथुरा) – चैनबिहारी मंदिर, कालियादेह घाट, चिरघाट व इतर अनेक घाट, धर्मशाळा व अन्नछत्र.
  • वेरूळ (महाराष्ट्र) – लाल दगडांचे मंदिर.
  • श्री वैजनाथ (परळी,) (महाराष्ट्र)– सन १७८४ मध्ये वैद्यनाथ मंदिराचा जीर्णोद्धार.
  • श्री शंभु महादेव पर्वत, शिंगणापूर (महाराष्ट्र) – विहीर.
  • श्रीशैल मल्लिकार्जुन (कुर्नुल, आंध्रप्रदेश) – शिवाचे मंदिर
  • संगमनेर (महाराष्ट्र)– राम मंदिर.
  • सप्‍तशृंगी – धर्मशाळा.
  • संभल? (संबळ) – लक्ष्मीनारायण मंदिर व २ विहिरी.
  • सरढाणा मीरत – चंडी देवीचे मंदिर.
  • साखरगाव (महाराष्ट्र)– विहीर.
  • सिंहपूर – शिव मंदिर व घाट
  • सुलतानपूर (खानदेश) (महाराष्ट्र)– मंदिर
  • सुलपेश्वर – महादेव मंदिर व अन्नछत्र
  • सोमनाथ मंदिर, धर्मशाळा, विहिरी.
  • सौराष्ट्र (गुजरात) – सन १७८५ मध्ये सोमनाथ मंदिर, जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा.
  • हरिद्वार (उ.प्र.) – कुशावर्त घाट व मोठी धर्मशाळा.
  • हांडिया – सिद्धनाथ मंदिरे, घाट व धर्मशाळा
  • हृषीकेश – अनेक मंदिरे, श्रीनाथजी व गोवर्धन राम मंदिर
  • नंदुरबार (महाराष्ट्र)- विहीर
  • मुक्ताईनगर(महाराष्ट्र)-मुक्ताबाई समाधीस्थळ कोथळी
  • समनापूर ता.संगमनेर(महाराष्ट्र)-पूरातन बारव (विहीर)

अहिल्याबाई होळकर यांच्यावरील माहितीपर पुस्तके

  1. 'अहिल्याबाई' : लेखक - श्री. हिरालाल शर्मा
  2. 'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. पुरुषोत्तम
  3. 'अहिल्याबाई चरित्र' : लेखक - श्री. मुकुंद वामन बर्वे
  4. अहिल्याबाई होळकर - वैचारिक राणी (लेखक : म.ब. कामत व व्ही.बी. खेर)
  5. अहिल्याबाई होळकर : लेखक - म.श्री. दीक्षित
  6. अहिल्याबाई होळकर (चरित्र), लेखक : खडपेकर
  7. कर्मयोगिनी : लेखिका - विजया जहागीरदार
  8. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (जनार्दन ओक)
  9. महाराष्‍ट्राचे शिल्‍पकार - तेजस्विनी अहिल्‍याबाई होळकर (लेखिका : विजया जहागीरदार; प्रकाशक : महाराष्ट्र सरकार)
  10. शिवयोगिनी (कादंबरी, लेखिका - नीलांबरी गानू)
  11. 'ज्ञात- अज्ञात अहिल्याबाई होळकर' लेखक - विनया खडपेकर